रस्ता सुरक्षा अभियान राबवणे हीच काळाची गरज – सहायक मोटर वाहन निरीक्षक हेमलता तावरे. न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात

 

                 पुरंदर रिपोर्टर Live 

 सोमेश्वरनगर | प्रतिनिधी

                            आजच्या धावपळीच्या आणि गतिमान जीवनशैलीच्या युगात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या वाहनांमुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अपघात रोखण्यासाठी, नागरिकांमध्ये वाहतूक नियमाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच सुरक्षिततेचे धडे देण्यासाठी "रस्ता सुरक्षा अभियान" राबवणे हीच काळाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन बारामती येथील सहायक मोटर वाहन निरीक्षक हेमलता तावरे यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  


वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये किशोर मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल, वाणेवाडी यांच्या सौजन्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला.


विद्यार्थ्यांशी थेट संवाद.  

              या अभियानामध्ये शासनाच्या नियमावलीत काय सांगितले आहे, वाहन चालवताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर का महत्त्वाचा आहे, अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर शिस्त कशी पाळावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन हेमलता तावरे यांनी विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तरे देत त्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यात आले.



यावेळी मानव अधिकार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव किशोर शेळके, पत्रकार मोहम्मद शेख, शाळेतील शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक मानसिंग जाधव यांनी भूषवले. पर्यवेक्षक हनुमंत खरात यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार अशोक भोसले यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नियमपालनाची जाणीव जागवली गेली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments